Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे राष्ट्रवादीने 50 टक्के जागा मागितल्या – सूत्र

spnews मुंबई:-  आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे राष्ट्रवादीने 50 टक्के जागा मागितल्या आहेत, अशी माहिती सोमवारी येथे सूत्रांनी सांगितली. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात देशपातळीवर आघाडी करण्यास राष्ट्रवादीने विरोध केला आहे. भाजपचा पराभव करायचा असल्यास, प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी काँग्रेसला दिला आहे.राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, राजकीय चित्र पाहता, आता काँग्रेससह मित्रपक्षांना अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे जे भाजपसोबत जाणार नाहीत, त्यांना आपल्याकडे घेतले पाहिजे. तामिळनाडूमध्ये डीएमके भाजपसोबत नाही. तेथे डीएमके हा एक नंबरचा पक्ष असल्यामुळे इतर पक्षांनी त्यांना साथ द्यावी. इतर राज्यांतही अशीच राजकीय खेळी करणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे जास्त खासदार असतील, त्याचा पंतप्रधान असेल, हे काँग्रेसच्या नेत्यांनीही स्पष्ट केले असल्यामुळे आघाडीमध्ये पंतप्रधानपदावरून वाद होणार नाहीत. राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे म्हटल्याचा मला आनंद आहे.1977 मध्ये कोणालाही प्रोजेक्ट न करता जनता पार्टीने इंदिरा गांधींचा पराभव केला होता. 2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या वेळी त्याची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे मोदींना पर्याय काय, असे विचारले जात आहे; पण सत्तेचा उपयोग चुकीच्या गोष्टींसाठी केला जात असेल, तर लोक गप्प बसत नाहीत, असा सूचक इशाराही त्यांनी भाजपला दिला.काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत देश व राज्यपातळीवरील नेत्यांच्या चर्चा होतील. काँग्रेसकडून अशोक गेहलोत, अशोक चव्हाण तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्‍ल पटेल आणि जयंत पाटील जागा वाटपाबाबत चर्चा करतील. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्याला रविवारी भेटले होते. मतदान यंत्राबाबतचे त्यांचे आक्षेप मला सांगितले. मतदान यंत्राबाबत लोकांच्याही शंका असल्यामुळे मतदानाची जुनी प्रक्रियाच चालू करावी, असे राज यांचे म्हणणे असल्याचे पवार यांनी सांगितले.